सांघिक कामगिरीच्या जोरावर नाशिक गट विजेता, सुपर लीगमध्ये प्रवेश

वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा: कर्णधार मुर्तुझा ट्रंकवाला, शेख,प्रतिक तिवारी,तेजस् पवारने नोंदवली सर्वीत्तम उत्कृष्ठ कामगिरी

नाशिक गटविजेता संघ

नाशिक- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए सिनियर इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामना प्रकारात , नाशिक जिल्हा क्रिकेट संघाच्या खेळाडुंनी, औरंगाबाद येथे खेळताना लक्षणीय कामगिरी केली व ब गट विजेतेपद मिळवत सुपर लीग मध्ये प्रवेश केला.

ब गटात समावेश असलेल्या नाशिक संघाने ५ साखळी सामन्यातील ३ सामन्यांत – किंग्स स्पोर्ट्स क्लब , पुणे , लातूर व हिंगोली वर निर्णायक विजय मिळवले तर औरंगाबाद विरुद्ध पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळविला. फक्त डेक्कन जिमखाना विरुद्धच्या सामन्यात नाशिक संघाने पहिल्या डावाच्या आघाडीचे गुण गमावले. शेवटच्या साखळी सामन्यात नाशिक संघाने औरंगाबाद विरुद्ध पहिल्या डावाच्या आघाडीचे गुण मिळवले. पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून नाशिकने प्रथम फलंदाजी करत २८१ धावा केल्या . मुर्तुझा ट्रंकवालाने ८५ , सत्यजित बच्छावने ५७, धनंजय ठाकूरने ४२ व कुणाल कोठावदेने ३५ धावा केल्या. उत्तरादाखल औरंगाबादला २१० धावांत रोखत नाशिकने ७१ धावांची आघाडी घेतली. नाशिकतर्फे यासर शेखने ४ , तेजस पवार व प्रतीक तिवारीने प्रत्येकी २ तर सत्यजित बच्छाव व तन्मय शिरोडेने प्रत्येकी १ गडी बाद केला . दुसऱ्या डावातहि मुर्तुझा ट्रंकवालाने नाबाद ६४ धावा केल्यावर १ बाद १२५ धावांवर सामना थांबवण्यात आला. फलंदाजीत रणजीपटू सलामीवीर मुर्तुझा ट्रंकवालाने १ शतक व ४ अर्धशतकांसह पाच सामन्यातील ८ डावांत ४९४ धावा फटकावल्या. सिद्धार्थ नक्काने ६ डावांत २२८ व कुणाल कोठावदेने ७ डावांत २११ धावा केल्या.

तन्मय शिरोडेची लक्षवेधी कामगिरी

तर गोलंदाजीत तन्मय शिरोडेने आपल्या डावखुरा फिरकीने पाच सामन्यातील ९ डावात २२ बळी घेतले. कर्णधार रणजीपटू सत्यजित बच्छावने चार सामन्यातील ७ डावात १८ बळी घेतले. तर प्रतीक तिवारीनेहि ५ डावात १६ व तेजस पवारने ९ डावात १० बळी घेतले. यष्टीरक्षक सौरभ गडाखनेहि ५ सामन्यात ९ बळी टिपत संघाच्या यशाला हातभार लावला.नाशिक जिल्हा क्रिकेट संघाला निवड समिति सदस्य सतीश गायकवाड, तरुण गुप्ता फैय्याज गंजीफ्रॉकवाला व नाशिक क्रिकेट ऑपरेशन कमिटी चे मुख्य राजेंद्र लेले यांचे मार्गदर्शन लाभले . तर प्रशिक्षक आहेत शांताराम मेणे. या लक्षणीय कामगिरी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

X