भावना गवळी संघ व्यवस्थापकपदी नियुक्तः सर्वीत्कृष्ठ कामगिरीची वरिष्ठांकडून दखल,गुरुवारपासून सुरवात
नाशिक- आपल्या सर्वीत्तम खेळीने मैदान गाजवणारी जिल्हा क्रिकेट संघटनेची ईश्वरी सावकार हिची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे त्रिवेंद्रम येथे आयोजित वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत ती महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करेल. तर नाशिकच्याच भावना गवळी यांची या संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली. नाशिककरांसाठी निश्चितच ही अभिमानास्पद बाब आहे.
ईश्वरीने यापूर्वी देखील महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ, तेवीस व एकोणीस वर्षांखालील अशा विविध वयोगटात महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. नुकत्याच झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे २३ वर्षांखालील महिलांसाठी टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत ईश्वरी सावकार ने फलंदाजीत प्रभावी कामगिरी केली.
गवळीचे सोळा वर्षापासून नाशिकच्या क्रिकेटपटूंना मार्गदर्शन
महाराष्ट्राच्या माजी क्रिकेटपटु, , बी सी सी आय लेव्हल १ प्रशिक्षक , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या भावना गवळी यांनी यापूर्वीच्या हंगामांतहि महाराष्ट्र महिला वरिष्ठ संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. त्या गेल्या सोळा वर्षांपासून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर नाशिकच्या महिला क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देत आहेत. ईश्वरी सावकार व भावना गवळी यांच्या या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व महिला संघात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी ईश्वरी सावकार व भावना गवळी यांचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दौरा असा- त्रिवेंद्रम येथे ४ ते १६ जानेवारी दरम्यान , बीसीसीआय तर्फे वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत, महाराष्ट्राचे साखळी सामने, पुढील प्रमाणे होणार आहेत – ४ जानेवारी हरयाणा , ६ जानेवारी उत्तर प्रदेश , १० जानेवारी राजस्थान , १२ जानेवारी मेघालय , १४ जानेवारी गोवा , १६ जानेवारी जम्मू व काश्मीर .