सुरगाणा संघाने किशोर सुर्यवंशी करंडक पटकावला

सुरगाणा संघाने किशोर सुर्यवंशी करंडक पटकावला

तुषार धुम,नितीन कडाळे,किशोर पेंढारकर,हेमंत चौधरी यांचा गौरव

नाशिक- राजेंद्र (नाना) सूर्यवंशी यांच्या सहकार्याने व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेत सुरगाणा संघाने दहावा किशोर सुर्यवंशी करंडक पटकावला. शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या या अंतिम सामन्यात सुरगाणा संघाने मालेगाव संघावर ५ गडी राखून विजेतेपद पटकावले.

अंतिम सामन्याच्या सोहळ्यास किशोर सूर्यवंशी यांचे बंधु महाराष्ट्र राज्याचे उत्पादन विभागाचे आयुक्त  विजय सूर्यवंशी हे प्रमुख पाहुणे होते. राज सूर्यवंशी, महाराष्ट्राचे माजी खेळाडू अपूर्व  दराडे , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे – सह सचिव योगेश -मुन्ना- हिरे ,सचिव समीर रकटे , निवड समिति सदस्य सतिश गायकवाड यांच्यासह एन डी सी ए चे इतर पदाधिकारी , संघ प्रशिक्षक उपस्थित होते. योगेश -मुन्ना- हिरे यांनी समयोचित भाषण केले . प्रमुख पाहुणे विजय सूर्यवंशी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना या स्पर्धेतूनच भावी राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त केली . सेक्रेटरी समीर रकटे यांनी आभार मानले . विवेक केतकर यांनी सुत्रसंचालन केले .

रंगतदार सामन्यात सुरगाणा संघ सर्वच बाबतीत सरस

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत मालेगाव संघाने ६ बाद ११६ धावा केल्या. अजिंक्य खापरेने  सर्वाधिक २६ धावा केल्या. रामदास धुम ने  ३ बळी घेतले . सुरगाणा संघाने विकास राठोड च्या फटकेबाज नाबाद ४४ धावांच्या जोरावर शेवटच्या चेंडूवर विजयी धाव घेतली. मंगेश शिरसाठ हे सुरगाणा संघाचे प्रशिक्षक होते.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला नाशिक ग्रामीणचा नितीन कडाळे – १४७ धावा  . सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुरगाणाचा तुषार धुम १० बळी  तर सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून मालेगावचा किशन पेंढारकर – यष्टीमागे ९ बळी –  यांनी पारितोषिक मिळवले . मालिकावीराचा  बहुमान मिळवला सुरगाणाचा हेमंत चौधरीने – १५० धावा व ८ बळी  .

या टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेमुळे नाशिक जिल्ह्यातील तालुक्यातील खेळाडूंना जिल्हास्तरावर आपल्या कामगिरीचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते. या स्पर्धेसाठी खास नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विविध निवड समिती सदस्यांनी, जिल्ह्याच्या सर्व १५ तालुक्यात जाऊन निवडीची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्येक तालुक्याचा अंतिम संघ निवडला .जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. चार गटात १५  संघात २३ साखळी व बाद फेरीचे ३ असे एकूण २६ सामने झाले .

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त मा.  विजय सूर्यवंशी यांचे हस्ते विजेत्या संघाला ट्रॉफी प्रदान करतानाचे  छायाचित्र सोबत जोडले आहे. समवेत : महाराष्ट्राचे माजी खेळाडू अपूर्व दराडे , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे – सह सचिव योगेश -मुन्ना- हिरे , सेक्रेटरी समीर रकटे , निवड समिति सदस्य सतिश गायकवाड व राज विजय सूर्यवंशी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *